जी ले जरा... (२)



पुन्हा ढग दाटून येतात... पुन्हा आठवणी जाग्या होतात... [पाऊस आला की सौमित्र च्या "गारवा"च्या ओळी आपसूक डोक्यात घोळायला लागतात...]
पावसाळ्यातील एक आठवण पुन्हा जागी झाली... सुखद आठवणी पडून गेलेल्या पावसाच्या गारव्यासारख्याच असतात नाही?? अंगभर सुखद गारवा लपेटून टाकणार्‍या... गात्रा गात्रांना तजेलदार करणार्‍या... स्वतःतच रमवणार्‍या...

आज डोअरला उभी होते.. पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलत आले... [नकळत मागच्या एका लेखात लिहीलेल्या पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेलणार्‍या "वेड्या मुली"ची आठवण भिजवून गेली. आज आजूबाजूच्या मला "वेडी" म्हणाल्या असतील...] कानात हेडफोन्स खुपसलेले... "सुहाना सफर" रेडीओवर सुरू... अन्नू कपूरचं परीपक्व, धीरगंभीर रसाळ सूत्रसंचालन... विषय... मधुबाला!! अशक्य स्वप्नाळू काँबीनेशन!! सुरेल सुरावटींचं मध थेंब थेंब कानात झिरपत.. आत आत सरकत जातं हृदयापर्यंत... कृष्णधवल चित्रफित स्वप्नाळू डोळ्यांसमोरून लडीवाळ पणे रांगू लागते... मधुबालाचे अल्लड, लाडीक भावविभोर विभ्रम... स्वप्नांतून जागी होतंच नाहीये मी... 





पुन्हा पाऊस पडतोय... मस्त खरपूस मातीचा वास... चहाच्या गरम कपात बुडवून चाखलेला!! अहाहा मला सांगा सुख यापेक्षा काय वेगळं असतं? आजच्या "सुहाना सफर", अवेळी आलेल्या पावसाने खरंच माझा पंधरावीस मिनीटांचा सफर सुहाना करून टाकला. पोहोचल्यावर हातात पडलेला गरमागरम ताज्या चहाचा कप... त्यात मिसळलेला मातीचा खरपूस वास...!! माझा "आज" या स्वप्नाला समर्पित!!
नाहीतरी जावेद अख्तर यांनी म्हटलंच आहे... "हर पल यहाँ, जी भर जियो... जो है समाँ... कल हो ना हो..."|


............................................................2..b...Continued.............................................................. 

जी ले जरा... (१)



रोजचं धकाधकीचं आयुष्य... कितीही काटेकोरपणे घड्याळाच्या हिशोबी काट्यांवर धावलं तरीही हमखास चुकवणारं... तसंही आपल्याला कुठे होता हा सोस हिशोबांचा...!! आपला आधीपासूनच मनमौजी कारभार!

सोनपिवळी गोजीरवाणी उबदार लुसलुशीत किरणे पापण्यांपर्यंत लुडबुडत रांगत आली की निवांत उठा... आळसावलेल्या देहाला सत्यसृष्टीत आणायचा अज्जिबात घिसडघाई अट्टाहास न करता तसंच पेंगूळलेल्या डोळ्यातल्या साखरस्वप्नांना गोंजारत पाच-दहा मिनिटं काढायची... पुन्हा काहीसं ठरवून पांघरूण डोक्यावर ओढून घ्यायचं पुढच्या पाच दहा मिनिटांसाठी, त्याच त्या साखरस्वप्नांना गोंजारत! स्वप्नांच्या चलतचित्रपटातील पुढील दृष्य मागील धाग्याला सांधत... अगदी आपल्या नावाने ठणाणा होऊन त्या स्वप्नचित्रपटात व्यत्यय येईपर्यंत! मग खिडकीशी रेंगाळायचं... बाहेरच्या झाडावरचं अल्लड पाखरू वेल्हाळपणे किलबिलाट करतंय... मग पहील्या चहाचा पहीला घोट!!! अहाहा स्वर्गीय अवर्णनीय सुख!! डोक्यात अज्जीबात कसले विचार नाहीत. खिडकीच्या कडेला ओठंगून हातातल्या स्पेशल गिफ्टेड मगातून आल्याने गंधाळलेल्या चहावरच्या वाफेचे वलय विरायच्या आत हळूच छोटासा घोट जीभेच्या टोकाला चटके देत घोळायचा... त्या चटक्याची वेदनाही सुखद वाटावी इतकं तोंडभर गंधाळलेला तो घोट क्षणात रंध्रा रंध्राला तजेलदार करून जातो... पुढचा गंधाळलेला घोट आणि मग तो चहाचा मग रिकामा होईपर्यंत ही अमृतघोटांची साखळी सुरूच... पेपर चहासोबत आवडलाच नाही कधी!! चहा आणि तोंडी लावायला भरपूर निवांतपणा!! हक्काचा आपला असा! त्या सुखसमाधीला कोणीही छेडू नये... जेव्हा तंद्री मोडेल तेव्हा मोडू द्यावी खुश्शाल... हा एकमेव तर वेळ जेव्हा आपण फक्त आपल्या स्वतःसोबत असतो... वेगळ्या मेडीटेशनची गरजच काय? झेन तत्वज्ञान याहून का वेगळं असतं???

ताज्या कोर्‍या वासाच्या, कोपराही दुमडला नसेल अशा परीटघडीसारख्या वर्तमानपत्राला हळूवार उलगडत बातम्या वाचायच्या... वैषम्य दाटवणार्‍याच बातम्या अधिक!! पण मघाच्या मेडीटेशनचा दांडगा प्रभाव मेंदूवर तरलपणे फिरत असल्यावर त्यांचं विशेष काही वाटूही नये...

दिवसभरात छानसं गाणं ऐकावं... एखादी स्वतःशीच आठवलेली एखादी लाघववेळ!!! स्वतःलाच ऐकू जाईल अशी खुदकन हास्याची नाजूक लकेर... एखादं कसदार साहित्य... कधी खूप स्फूर्ती देणारं.. कधी खूप विचार करायला लावून स्वतःशीच एक मोठ्ठा हम्म्म्म्म्म म्हणायला लावणारं... तर कधी स्वतःच्याही नकळत टचकन डोळ्यांतून पाणी काढणारं...
एखादा सर्वांगसुंदर चित्रपट... नावीन्यपूर्ण विषयाने आणि कसदार अभिनयाने नटलेला... कचकड्याच्या नाचगाण्यांपासून आणि चकचकीत कृत्रीम निसर्गसौंदर्य(!!!??) दृष्यांपासून दूर...

आणि मग अचानकपणे एक दिवस ढकलले जातो माणसांच्या समुद्रात!! घड्याळाच्या काट्यांवर अविरत धावणार्‍या गर्दीचा एक भाग बनून...!! आपले आपण आपल्यालाही अनोळखी वाटावे असे हरवून जातो...

हे सगळं आज असं अचानक आठवायचं कारण??? कालच नाही का "तारें जमीन पर" लागलेला कुठल्याशा वाहीनीवर... त्यातलं गाणं... "है दुनिया का नारा.. जमे रहो...." अचानक त्यातल्या इशानची एंट्री... सूर्याची किरणे झेलत कूस बदलणं असो किंवा आळसावून ब्रश तोंडात धरून बेसिनला ओठंगलेलं असो... किंवा मग निवांत वेळ सत्कारणी लावत खास कमोडवरच्या स्वनिर्मीत भारी भारी कल्पना... कुठेतरी स्वतःच्या त्या हरवलेल्या अंशाचं प्रतिबिंब सापडू पाहतेय तोच बॅकग्राऊंडला वाजतं ढँडSS ढँडSS "है दुनिया का नारा..SS जमे रहो....ss" आणि लगबगीने आपण आपलं जडावलेलं बूड टिव्ही समोरून हलवतो.. पुढच्या कामासाठी.. आपल्यातला सापडू पाहणारा मनमौजी इशान पुन्हा हरवतो घड्याळाच्या काट्यांच्या हिशोबात!!! त्याला तरी कुठे हा हिशोब जमत असतो!! मग अशाच या धावपळीत स्वतःसाठी अगदी चोरलेला छोटासा वेळ... त्यामध्ये वाचलेला व्हॉट्सअ‍ॅपवरचा इन्स्पायरिंग मेसेज किंवा फेसबूक वरची एन्करेजींग पोस्ट... नकळत आपल्या आतल्या घुसमटणार्‍या आणि विझू विझू लागलेल्या इशानच्या स्वप्नांना नवी धुगधुगी देणारा राम शंकर निकुंभ सापडतो!! आणि मग आठवणींच्या यादीतील मागचं पान हळूवारपणे उलगडलं जातं... लांबलचक यादीच!!! ठरवलेल्या अन करावयाच्या राहीलेल्या गोष्टींची... 





पुन्हा सापडू पाहणारा मनमौजी इशान...! आपल्याच आत...! आपणच खोलवर दडपून टाकलेला... आतल्या आत घुसमटणारा...पुन्हा एकदा बेधुंद बेभान निवांत जगू पाहणारा... मनापासून, मनासारखं!!! पकडून ठेवायचा अनिवार मोह होतोय नाही... काही क्षण तरी...! निदान पुढचा "है दुनिया का नारा.. जमे रहो...." चा ढँड ढँड पुकारा होईपर्यंत आणि आपल्यातले आपण हिशोबी दुनियेत हरवेपर्यंत...!! मग म्हणूयात का आपल्यातल्या या अतरंगी मनमौजी निरागस इशानला... "जी ले जरा..."

............................................................2..b...Continued...............................................................
 


                                                                                                                                   July 11, 2013

पाऊस खूप आहे आज... कोसळतोच आहे... मी बसलेय इतरजणींसारखीच... पावसाच्या झडींपासून अंग चोरत... एकेकजण येताहेत... चिप्प भिजलेल्या... ओढण्यांची टोकं पिळत, ड्रेस आणि छत्र्या झटकत... त्यांचे उडणारे थेंबही मी चुकवतेय.... आधीच आकसलेलं अंग अजूनच चोरून घेतेय ( जितकं जमेल तितकंच अर्थात.. :D ) त्या त्रासिकपणे म्हणताहेत "कित्ती पाऊसेय नै आज... श्शी बाई कंटाळाच आलाय..." पुन्हा त्राग्याने ड्रेसची ओलीचिप्प टोकं फडफडवणं... ते उडणारे तुषार शिताफीने चुकवत मी त्यांच्याकडे बघून हसते... थोडंसं ओळखीचं, थोडंसं अनोळखी, थोडंसं सांत्वनपर.. आणि खुपसं खुशीचं...! मी आज लवकर आलेली असते ना... इथेतिथे बघत टीपी करेपर्यंत "हा" धो धो कोसळायला लागतो... "वाचले बुवा!" माझं मन खुशीत मांडे खातं... चिप्प भिजून एसीच्या त्या बोचर्‍या थंडीत ओले कपडे अंगावर वाळवत बसायचं??? छ्या!!

रंगीबेरंगी ओल्याचिप्प गर्दीने ट्रेन फुगते... कोणी आडोसे शोधत दाराशीच उभ्या राहतात... कोणी खिडकीशी सुरक्षित अंतर राखत चिकटून चिकटून बसतात...एकमेकांना बिलगून तारेवर बसलेल्या भिजलेल्या पाखरांसारख्या...!
रोज विंडोसिट पकडायला धावणार्‍या आज उदार अंतःकरणाने विंडोसिट ऑफर करत होत्या...
थेंबथेंब पाणी गाळणार्‍या चिप्प छत्र्या खिडकीच्या हँडल्सवर विसावत होत्या... कॉलेजकन्यकांचा घोळका बाजूलाच चिवचिवत असतो... नव्या फ्रीलवाल्या छत्रीला ट्रेनमध्येच उघडून वर तीघींच्या डोक्यावर धरत फॅनखाली वाळवत असतो... स्वतःचे फंकी ट्रान्सपरंट सँडल्स दाखवत मग ते कुठून आणि कितीला मिळाले याचं साग्रसंगीत वर्णन करत... कॉलेजगर्ल्सला कुठल्याच विषयांचं वावडं नसतं ना... पावसाच्या थेंबासारखा एखादा विषय सापडावा आणि मग त्याचे हात धरून बाकीच्या थेंबांनी कोसळत राहावं संततधारेसारखं तशा कोसळत राहतात... मी हसते स्वतःशीच... तिथेच कोणीतरी हँडलवर चक्क ओढणी वाळत घातलेली असते... बायका म्हणजे ना... उपलब्ध सोर्सेसचा वापर आपल्याला हवा तसा कसा काय करायचा हे त्यांना कध्धीच शिकवावं लागत नाही.

इथे कोणी ऑफीसला जाणारी फॅशनेबल सुंदरी आपले लांबसडक केस हलकेच झटकते... खिडकी अन दरवाज्याच्या उरल्यासुरल्या फटीतून डोकावणार्‍या बाहेरच्या कित्येक भिरभिरत्या डोळ्यांना क्षणभर विश्रांती मिळते... काय म्हणत असतील मनात? "ना झटको जुल्फसे मोती...?" मी हसते पुन्हा स्वतःशीच!
तिथे कोणीतरी तल्लीनपणे आपले टप्पोरे डोळे काजळकाळे करण्यात गुंग असते... मग हळूच चिमुकला आरसा उघडला जातो... चिमुकला रूमाल चेहर्‍यावरून हलकेच फिरतो... आरश्याचे अँगल्स बदलतात चेहर्‍याच्या अँगल्सच्या प्रपोर्शन्मध्ये... मग एखादी सुखद गुलबट छटा नाजूक ओठांवर अलगद पसरते... ओठांच्या पाकळ्या एकमेकांशी मिटमिट करतात... हा सगळा शृंगारसोहोळा आजूबाजूच्या तोंड नी डोळे विस्फारून पाहत राहतात... काय विचार करत असतील मनात... "नटवी मेल्ली!!", "कित्ती सुंदर शेडंय नै? कुठल्या कंपनीची आहे पाहू... श्शीSS बाई दिसलीच नाही!!!", "ह्म्म आपल्यालाही अस्सं प्रेझेंटेबल राहायला हवं.... ठरवूनही ह्या कामाच्या धबगड्यात चिंबून जायला होतंय... स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये... श्शी!!"
असंच काही बाही... आता मला थोडं जोरात हसायला येतं... कानात हेडफोनची ढेकणं कोंबलेली असल्याने माझ्या मेंदूच्या विकासावर वा विकारावर कोणी फारसा विचार करत नाही...

तेवढ्यात "ती" दिसते... कानात हेडफोन्स खुपसलेले... हातात मोबाईलचं धुड... आणि दरवाज्याच्या कोपर्‍यात स्टील बारला कवेत घेऊन लोंबकळत असते... तोंडावर प्रतिथयश गायिकेचे हजारो विभ्रम! स्वत:शीच मग्न... तालासुरात गाणं म्हणतेय कुठलंसं... दरवाज्याच्या फटीतून पाऊसझडी आत घुसखोरी करताहेत... हिला पर्वाच नाही... त्या झडींवर खुशाल चेहरा सोपवलाय... पाऊसझडी गालावर-नाकावर-कपाळावर थडाथड आपटताहेत... ही गातेच आहे... डोळे मिटून तल्लीनपणे... इथे बाकीच्या सगळ्याजणी मांजरीसारख्या अंग आकसून हाताचे पंजे उलटसुलट चेहर्‍यावर फिरवत शक्य तितकं कोरडं व्हायचा प्रयत्न करताहेत आणि ही बया खुशाल त्या पावसाला म्हणतेय... भिजव... आणखी!! वेडी कुठली... माझं स्टेशन आलं... मला जागा करून देत ती मागे सरकली... "उतरायचं नाहीये?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारते... जोरजोरात मान हालवत म्हणते "नाही.." "अगं मग?" मी हातानेच विचारते... ती गोडशी हसते... चेहर्‍यावरून ओघळणारे थेंब ओढणीनेच हलकेच पुसून काढते... मी जोरात हसते... आत खोलवर कुठेतरी छोटीशी वेदना सटपटते... का? कारण कळतच नाहीये... मी पुन्हा तिच्या कडे पाहते... ती दरवाज्यातून दिसणार्‍या आभाळाच्या तुकड्याला निरखत गातेच आहे... कसला मेघमल्हार आळवतेय कधीपासून कोणास ठाऊक! काय आहे माझ्या नजरेत... हेवा, अचंबा, कौतूक?? कळतच नाहीये... आत खोलवर कळ उमटतेच आहे...

स्टेशन दृष्टीपथात येतंय... उतरायचंय आता... मी पर्स, छत्री, ओढणी, स्वतः असा सगळा सरंजाम सावरते... आणि थोडीशी झेपावते दारातून बाहेर... पाऊस कोसळतच असतो... थोडे तुषार माझ्या चेहर्‍यावर धडपडत उड्या मारतात... मी मागे सरकायचा प्रयत्न करते पण मागे गड लढवणार्‍या मावळ्यांनी रस्ता बंद केलाय... पुढेच लढायचंय... मी नकळत डोळे मिटते... चेहरा आपसूक पुढे करते आणि म्हणते... भिजव... आणखी...! पाऊस खुशीत हसतो... झेपावतो आणि भिजवतो मला... मी भिजत राहते.. निशब्दपणे... कधीकाळचा तराणा भिजलेल्या ओठांवर अवतरतो... मी सूर पकडते, स्वतःच्याच नादात... चेहर्‍यावर प्रथितयश गायिकेचे भावविभ्रम आपसूक पांघरले जातात... मागून धक्के येताहेत... माझी समाधी भंग पावते... स्टेशन आलं वाट्टे... धुंदीत उतरते... उतरण्यापूर्वी आपसूक नजर "ति"च्याकडे वळते... ती हसते... खूपसं ओळखीचं!! मीही हसते... मोकळं, सैलावलेलं, स्वच्छ, निरभ्र!!

शब्द ओठातच घुटमळतात...तिला सांगायचे असलेले... "चार वर्षात पाहीलेली तू दुसरी वेडी! पाऊस बेभानपणे झेलणारी!! पावसाला बघून हसणारी... मला आवडतात, पावसाला बघून स्वतःशीच हसणारी माणसं!! आणि हो! पहीली वेडी... ती मीच गं!! कित्त्येक दिवसांनी सापडलेय... माझी मीच, मला, पुन्हा!!! थँक्स टू यू..."
माहीत नाही ती वेडी पुन्हा भेटेल की नाही... असेल कदाचित फेसबूक वर कुठेतरी... शेअर अन लाईक्सच्या साखळीत गुंतेलही कदाचित आणि मग ओळखीचं हसेलही स्वतःशीच, पुन्हा एकदा!!!

- स्वप्ना....
                  



तळटीपः सॉरी लोक्स, पुन्हा पुन्हा एकच फोटो अपलोड करतेय... पण काय करू प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडलाय मला तो... प्रेमातच पडलीये मी त्याच्या!

चित्र सौ. : elenakalisphoto.com

ललित : पाऊस! माझा प्राणप्रिय सखा!!


इतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठाऊक! बरसलाच की काल रात्री - मनसोक्त, आससून!! जणू तो सुद्धा मला खूप 'मिस' करत होता... खरं तर तो कित्येकांचा सखा!! प्रत्येकासाठी बरसतो-अगदी हातचं न राखून! पण जेव्हा कधी खिडकीत बसून त्याला डोळे भरून न्याहाळत असते- मला वाटतं तो फक्त आणि फक्त मलाच भेटायला आला आहे... कृष्ण सखा नाही का प्रत्येक गोपिकेला फक्त आपला एकटीचाच सखा वाटे तस्संच! रूसलेय ना मी, इतके दिवस मी त्याची चातकासारखी वाट पाहतेय आणि हा कुठे दडी मारून बसलेला कोणास ठाऊक!! मग हळूच येतो, छान मोकळं मोकळं प्रसन्न हसू हसतो... खरं तर त्याच्या चाहुलीनेच, त्याच्या अंगागंधाच्या मंद सुगंधानेच मी वेडीपिशी झालेली असते... पण जाम ताकास तूर लागू देत नाही! माझा रूसण्याचा हक्क, तुझं मनवण्याचं कर्तव्य! अगदी हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसते मी... पाहतही नाही त्याच्याकडे... तो माझी हरप्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो... कधी कान पकडून, उठाबश्या काढून, क्वचित एखादी सुरम्य गाण्याची लकेर गुणगुणून... लटक्या रूसव्याने फुगलेल्या माझ्या गालावर फुंकर मारून तर माझ्या बटांना अल्लदपणे विस्कटून तर कधी चेहर्‍यावर असंख्य तुषारांची बरसात करून... कधी असंख्य सरींचे अलवार हात लडीवाळपणे गळ्यात टाकून..!! मी खुदकन हसते... नाहीच रूष्ट राहता येत त्याच्यावर फारसं!! कित्ती लोभस आहे तो...!!!
प्रियतमेला कसं खुलवायचं फुलवायचं हे तंत्र त्यानं चांगलंच आत्मसात केलंय! लब्बाड कुठला!! गालगुच्चाच घ्यावासा वाटतो त्याचा... पण तो कुठला थांबायला एवढा वेळ!! वेड लावून पसार व्हायचं ही जुनीच खोड आहे त्याची!! पण मी मात्र त्याच्या सुखद आठवणींनी एकाच वेळेस तृप्त नी घायाळ व्हायचं... त्या एकांतातल्या विजनात!!




खरं तर झोकून देण्याची, सर्वस्व दुसर्‍यावर उधळून रितं होण्याची कला मी त्याच्याकडूनच शिकले... पण इतरांना तृप्त करताना आपण मात्र रिक्तच राहतो याची खंत तो फारसा कधी बाळगत नाही... हे मात्र अजूनही मला तितकंसं जमलेलं नाही!! त्या वेड्याला जाणवत तरी असेल का स्वतःचे रितेपण?? छे!! तो तर लुटवण्यात, उधळण्यात... स्वतःच्याच तालात उन्मुक्तपणे बरसण्यात तल्लीन!! एखाद्या कसलेल्या शास्त्रीयसंगीत गायकाने रियाझ करतानाही तल्लीन पणे स्वतःशीच एक अशी हरकत घ्यावी अन आजूबाजूच्यांना त्या सूरांच्या बरसातीने चिंब भिजवून टाकावे; स्वतःच्याही नकळत.. तसंच काहीसं!!

पावसाबद्दल लिहा-बोलायला लागले ना की मला माझंही भान राहत नाही. त्याचे कित्येक लोभस विभ्रम मला कित्येकदा वेड लावतात. खरं तर त्याच्या येण्याच्या चाहूलीनेच त्याने मला अर्धी गारद केलेली असते... त्याच्या आगमनाचा तो मादक मोहक सुगंध- इवले इवले थंडगार थेंब झेपावत कधी टप्पोरे होत जातात... आणि हलक्या सरींनी लुभावत तो आवेगपूर्ण पाऊसझडींनी कधी गुदमरून टाकायला लावतो ते समजतही नाही... तो बेभानपणे कोसळत राहतो... आंणि आपण ते फक्त अनुभवायचं- त्याचा आवेग, त्याचा जोष... निस्तब्धपणे, निशब्दपणे!!

तप्त रूष्ट धरणीला आपल्या थेंबांच्या नाजूक जादुई बोटांनी हळूवारपणे हसवतो, खुलवतो, फुलवतो... हलक्या सरीच्या अलवार हातांनी तिच्या भुरभुरणार्‍या शुष्क वेलींच्या बटा अलगद कानांमागे सारतो आणि तिच्या लालेलाल तत्प्त घामेजल्या चेहर्‍यावर अलगद प्रेमाची फुंकर घालतो आणि मग बरसतो- बरसत राहतो...बेभानपणे! तप्त धरित्रीची गात्रं गात्रं त्याचं ते बेभान प्रेम पिऊन श्रांत क्लांत होऊन तृप्त होईपर्यंत! त्याचे हे सारे भावविभोर, आत्ममग्न लोभस विभ्रम अन नवसृजनाचा हा सारा अविष्कार खिडकीतून डोळे भरून पाहत असते... धरणीचा मादक गंधभरला तो तृप्त निश्वास मला ऐकू येतो... स्त्रीसुलभ मत्सराने मी काहीशी अस्वस्थ होते... थोडीशी पेटूनही उठते... घायाळ होऊन कळवळून पाऊससख्याला विनवते... मी ही अशीच ग्रासलेय, त्रासलेय रे! दुखःच्या ग्रीष्मझळांनी माझ्या तनामनाची काहीली होतेय... मलाही असंच सचैल न्हाऊ घाल- चिंब, नखशिखांत! कणाकणाने- बेभानपणे!! तो येतो... माझ्या नकोश्या जाणीवानेणीवांतून तो अलगद हात देऊन मला बाहेर काढतो, स्वतःच्या बेभानपणाने मला भारून टाकतो... त्याचं ते बेभान होणं सुप्तपणे माझ्यात पेरून जातो... मी बेभान होत राहते पुन्हा पुन्हा... भानावर येईपर्यंत!!

वेड लावतात मला या पावसाची सगळीच वैविध्यपूर्ण रूपं- वार्‍याने त्रेधा उडव्त अवखळपणे भुरभुरणारा, थेंबांचा फेर धरून, तारांवरून, तृणपात्यांवरून थेंब बनून अल्लडपणे ओथंबणारा, कधी पागोळ्या बनून निरागसपणे बरसणारा, कधी तत्ववेत्त्याप्रमाणे गंभीरपणे संतत्धारेच्या रूपाने तर कधी उन्मुक्त बेभान प्रियकराप्रमाणे पाऊसझडींमध्ये अविरत कोसळून गुदमरून टाकणारा! बरसून रितं झाल्यानंतरचा त्याचा हवाहवासा मादक गंधगारवा मी अंगांगभर लपेटून घेते शहारत!!

एकांतात कधीकाळची विसरली गेलेली जखम त्या विजनात भक्ककन उघडी पडते, त्यावर काळाची धरलेली खपली उचकटली जाऊन भळभळत राहते- बाहेरच्या पावसासोबत! बाहेरच्या पावसाला माझ्या या आतल्या मूकपणे झरणार्‍या पावसाचा सुगावा कसा लागतो कोणास ठाऊक? पण मग तो एखाद्या समंजस प्रियकरासारखा शांतपणे बरसत राहतो. त्याच्या असंख्य रूपेरी शीतल हातांनी मला कवेत घेऊन हळूवार थोपटत राहतो. मी त्याच्या आश्वासक मिठीत विरघळून जाते...कणाकणाने!

कधी कधी मात्र पाऊससखा रंगात येतो. आपल्या वात्रट मित्राला, वार्‍याला हाताशी धरून उगाच छेडखानी करत राहतो.. कधी ओढणीमध्ये ओढाळपणे लपायला पाहील तर कधी केसांच्या उन्मुक्त बटांबरोबर खेळू पाहील... चिंब ओलेतं रूप चोरून पाहण्यासाठी उगाच धडपड करीत राहील... आणि मग माझ्या हातातील छ्त्री वार्‍याच्या एका जोरदार झोताने पलटी झाली की दोघंजणं "कश्शी मज्जा केली!!" असं मिस्कीलपणे म्हणत एकमेकांना टाळी देत अवखळपणे हसतील.. कसं रागावू या लोभस विभ्रमांवर?? मलाही तर ते सारेच्या सारे हवेहवेसे असतात. या भावविभोर विभ्रमांना डोळे भरून पाहण्यासाठी- अनुभवण्यासाठी मी चार महीने विजनाचा वैशाखवणवा सहन केलेला असतो- माझा पाऊस सखा येईल अन माझ्या सार्‍या ठसठसत्या वेदनांवर अलवार फुंकर घालेल... तो येतोही! माझ्या मनातले भाव बरोब्बर पकडत तो येतो. मी उदास गप्पगप्पशी दिसले तर पार अस्वस्थ होतो... स्वतःच अस्वस्थ होऊन बरसत राहतो... त्याला अजिब्बात आवडत नाही मला त्रास झालेला... वेडा आहे तो-- माझ्यासारखाच! अवखळपणे, कधी लडीवाळपणे तर कधी बेभानपणे मला त्याच्या प्रेमवर्षावात चिंब चिंब न्हाऊ घालतो. तापलेल्या अवनीप्रमाणे मीही त्याला पिऊन टाकते... तो रिता रिता होतो... मी तृप्त तृप्त होते... श्रांत-क्लांत!!

मला पुन्हा एकदा वेड लावून माझ्या पाऊससख्याने दडी मारलेली असते... मी बेभान सुखाने गुंगावलेली असते...
एव्हाना परीसराने ओलसर मखमली जांभळट काळोखाची दुलई ओढलेली असते. आकाशाच्या गर्दगडद पटलावर एखाद्या गुबगुबीत करड्या जांभळ्या ढगाआडून चंद्र हलकेच डोळे मिचकावत हसतो! आत रेडिओवर कधीपासून वाजत असलेला मिलींद इंगळेचा 'गारवा' एव्हाना संपत आलेला असतो... रित्या धीरगंभीर सुरात उर्वरीत स्वर गंधाळत राहतात...

"पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!"


--- स्वप्नाली वडके तेरसे

ललित : रंगायतन!!

नुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी! रंगांचा उत्सव! ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निसर्गाने केलेली मुबलक रंगागंधांची उधळण अनुभवत आपणही त्या निसर्गरंगात मनसोक्त डुंबून घेतो... राज्यातील अन समस्त देशभरातीलच कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या लोकांचा विचार करत सरकारने केलेल्या पानी बचाओ आवाहनाला समस्त देशभरातील आबालवृद्धांनी कौतुकास्पद साद दिली अन कोरडी होळी(धुलीवंदन) साजरी केली...

यावेळी रंग खेळायला नवरा नव्हता सोबत!
[तसंही तो बोका आहे, अंघोळीच्या वेळी काय भिजेल तोच! एरवी पाण्याचा शिंतोडा उडाला तरी हात झटकत बसणार... पावसात भिजणे-बिजणे तर सोडाच! तेव्हडा रोमँटिकपणा नाहीये हो आमच्या नशीबात!! : (
बाहेर पाऊस पडायला लागला की माझ्या मनमोराचा पिसारा हाSS फुलारून येतो!!! तो गुलाबी गारवा... एकांतातला शहारा... कुंद हवा... धुंद वातावरण खिडकीतून मी पाहून पाहून वेडी होत असते... मनात पिंगा घातलेला असतो आल्याने गंधाळलेल्या वाफाळत्या कडक चहाचा व गरमागरम कुरकुरीत खमंग खेकडाभज्यांचा वास... झालंच तर मग मोगर्‍याच्या अर्धवट उमललेल्या धुंद कळ्यांचा आणि ओलसर मातीचा खरपूस वास, जगजीतच्या मधाळ कातील गझला आये हाये!!! आणि फुस्स आमचं अर्धांग आळसावलेल्या बोक्यासारखं सोफ्यावर हात पाय जितके म्हणून वळकटी वळता येइल तितके पोटाखाली मुडपून लोळत असतं... माझ्या मनातले आल्याचा चहा नी भज्यांचे वास ही साम्यस्थळं सोडल्यास बाकीचे प्रकार कशाशी खातात हे गावीही नसतं यांच्या!!! आणि रंगपंचमीचे रंग!!! अर्रे माझ्या कर्मा!! चमचमीत नॉनव्हेज्/मिसळ ओरपताना मसलट तेलाचा एखादा पुसटसा शिंतोडा जरी पांढर्‍याशुभ्र बनियन वर पडला तरी हे राम!!! हे रंगाबिंगाचं काय घेऊन बसलात!!!]
मी मात्र खेळले मनसोक्त रंगपंचमी माझ्या पिल्लूसोबत... अगदी नैसर्गिक! हळदीने, आणि त्याच्या माश्याच्या पिचकारीत जेवढं पाणी मावेल तेवढ्या पाव वाटीभर पाण्यात!!! वर पिल्लूने चिमुकल्या हातांनी गालाला लावलेल्या हळदीने थोडेतरी गाल उजळलेत का तेही चोरून बघून घेतलं आरशात... पी हळद हो गोरी! च्या अतिउत्साहाने!!


नवरेबुवांचं रंगांचं तथाकथित ज्ञान तसंही अगाध(!!???) आहे! नुकतच लग्न झालं तेव्हा साडी घेताना प्राथमिक रंगांचीच माहीती असल्याने बॉटलग्रीन, हिरवाजर्द, मेहंदी, पोपटी, पिस्ता, मग झालंच तर चटणी वगैरे छ्टांपर्यंत आमची गाडी घसरल्याने येताना समोसे नी पुदीना चटनी आणून चट्टामट्टा करत बसायला हवं होतं... पोटात कावळ्या-उंदरांनी फेर धरलाय!! असे काहीसे अस्वस्थ भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरलेले... टोमॅटो रंगाचा शालू नी चटणी रंगाची साखरपुड्याची साडी घेतल्यावर आता गृहप्रवेशाला काय चिंचेच्या कोळाचा कलर पाहूयात का? सँडविचच्या सगळ्या झणझणीत चटण्या त्याच्या डोळ्यांत उतरलेल्या आणि टोमणे अधिकाधिक आंबट झालेले... खरेदी आवरती घेऊन आधी पोपूला धावावं लागलं होतं...

खरेदीसाठी गेल्यावर सरळसाध्या लाल रंगाला लाल न म्हणता उग्गाच डाळींबी, कोकमी, कुसुंबी, टोमॅटो, मरून, तपकीरी, विटकरी अशी विशेषणं का देतात याचा विचार करकरून नवरोबांच्या उत्साहाला वीट अन मेंदूला झीट आलेली असते...
 



तरी नशीब!! हल्ली हल्लीच फ्याशनमॅनियाक झाल्यासारखं जबाँग, फॅब इंडिया नी पँटालून्सच्या साईट्स वर भरकटून मिंत्राने दिलेल्या फॅशन मंत्रानुसार इंग्लिश कलर्स सांगत बसत नाही त्याला!! "लिनन-- हा कलरेय? हे तर कापडेय ना..." (कित्ती गं बाई गुणाचा माझा नवरा तो!! नश्शीब!! कापडाचे प्रकार तरी माहीतेत! नाहीतर कॉटन एके कॉटन!!!) मनातूनच अलाबला करत मधाळ नजरेने त्याला म्हटलं "नाही रे राजा ही पांढर्‍या रंगाची शेड आहे..!"

"पांढर्‍याची शेड?? हॅ!! पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र!!! दुधासारखा! झालंच तर अगदी धुतल्या तांदळासारखा!! (लग्नाची बायको शोधताना कॅरॅक्टरचा हा क्रायटेरिया घरात बोलला गेला असावा... नाहीतर भात लावण्याआधी तांदूळ-बिंदूळ धुतात, मोदकाचे तांदूळ धुवून वाळवलेले असतात हे माहीत असणे शक्यच नाही!!) , नाहीतर रिन की अगदीच हाईट म्हणजे उजालाकी निळसर सफेदी!! बास!!"

नाही रे राजा... मी तत्ववेत्त्याच्या सूरात समजावत म्हणाले, अरे क्रीम, आयवरी(हस्तीदंती), व्हॅनिला, एगशेल, स्मोकी(धुरकट), पिवळसर पांढरा, निळसर सफेद, गुलबटसर पांढरा(लिनन/बेज), पोपटीसर पांढरी अमका नी ढमका! नवर्‍याचा मेंदू धुरकट पांढरा पडलेला एव्हाना माझं पंडूर प्रवचन ऐकून!!! अजून पुढचे सेकंडरी कलर शेड्स व अमक्या ढमक्या असंख्य रंगछटा शिल्लक होत्या... पुढचा धोका सूज्ञपणे ओळखत दुसर्‍या कुठल्याही समंजस नवर्‍याने त्याप्रसंगी केलं असतं तेच प्रसंगावधान राखत आमच्या नवरोबांनी 'फोन आलाय वाट्टं..' असं 'कोण आहे रे तिकडे??' च्या चालीवर पलायन केलं!! हे समजण्याइतकी मी हुशार बायको आहे, पण जाऊंदे मला काय?? त्याचंच नुकसान!! आणि तसंही.. 'आमच्या हिला माझ्यापेक्षा जरा जास्त फॅशनसेंस आहे' असं नवर्‍याने कधीकाळी केलेलं कौतूक पदरात पाडून घ्यायला कुठल्या बायकोला नाही बरं आवडणार??

पण या रंगांचा प्रॉब्लेम माझ्याच कशाला, सगळ्याच बायकांच्या नवर्‍यांना असतो वाटते...लाँड्रीला दिलेली बेडशिट बरेच दिवस परत न मिळाल्याने मी लाँड्रीवाल्याला समजावत होते," भैय्या ती पांढरी बेडशिट नाही दिलीत परत... वो सफेद, उसपर वेली वेली का निळसर डिझाईन है ना... और निळे छोटे छोटे ठिपके..." त्याचा चेहरा एका मोठ्या निळ्या ठिपक्यासारखा अनभिज्ञ! नवर्‍याने सांगितलं "भैय्या परसों दी थी सफेद चद्दर बेडशिट वो लाके नही दी!" निळा ठिपका माणसात आला.... "लाता हूं" असं म्हणत हसत हसत कपड्यांचं गाठोडं खांद्याला अडकवत तो पसार झाला...
नवर्‍याला त्याचा प्रॉब्लेम (आपबिती वरून) लग्गेच समजला... आणि लग्गेच मदतीला गेला... नवर्‍याचा चेहरा, "तेरा दर्द मै समझ सकता हूं मेरे भाई...!" अरे वा एकमेकां करू साहाय्य!!! छाने!!

परवा नवर्‍याने मात्र कहर केला... ऑफीसातनं फोन केला, "अचानक माझं(त्याचं) माहेरी(त्याच्या) जाणं ठरतंय तर ती गोल्डन ब्राऊन बॅग भरून ठेव!!"

बाई गं!! गोल्डन ब्राऊन??? माझ्या नजरेसमोर नुकत्याच धुळवडीत रंगलेले असंख्य चंदेरी-सोनेरी ऑईलपेंट कलर्स तरळून गेले... बघीतलं तर बेडच्या तळाशी एक मिलीटरी ग्रीन रंगाची, एक डार्क कॉफी रंगाची आवि त्याची नेहमीची बेज रंगाची!!! आता यात गोल्डन ब्राऊन म्हणजे मिलीटरी नक्कीच नसणार नाहीतर तो कोथींबीर चटणी हिरवी वगैरे म्हटला असता..आता उरल्या दोन!! तरी खात्री करण्यासाठी त्यातली एक कपाटाला लाऊन बघितली... मग त्याला फोन केला... "आपलं कपाट कुठल्या रंगाचंय रे?" माझा स्थितप्रज्ञ आवाज! "ते ना... फिकट तपकीरी!!" त्याचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर! बरं म्हणत मी फोन ठेवला...

घरी आल्यावर त्याची "त्याला हवी असलेली" मी भरून ठेवलेली बॅग उचलून त्याच्या माहेरी प्रयाण केलं.

अवांतर माहीतीसाठी: त्या बॅगेचा आणि कपाटाचा रंग डिटो सेम आहे आणि तो आहे बेज!!!!असो! आता कानाला खडा!! नवर्‍याला प्रायमरी - लाल,हिरवा, निळा रंग सांगायची परवानगी आहे... छ्टा नकोच!!! अर्थ लावता लावता माझ्या चेहर्‍याचा रंग उडतो... :)


१४ फेब्रूवारी, व्हॅलेंटाईन्स डे! पाश्चात्य संस्कृतीतील प्रेमिकांचा दिवस!! पण यावर्षी १४ फेब्रूवारी २०१३ याच दिवशी भारतीय संस्कृतीमधील प्रेमाचा देव कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस! 'माघ शुक्ल पंचमी' हा कामदेवाचा जन्मदिवस 'वसंत पंचमी' म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीला दांपत्यसुखासाठी प्रेमाच्या, सौंदर्याच्या आणि शृंगाराच्या देवता 'कामदेव - रती' यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत या दिवसापासून वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतूराज वसंत नवसृजनाचे, चैतन्याचे, आनंद- उत्साहाचे लेणे घेऊन येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्तहस्ते उधळण करीत येणार्‍या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून वसंतपंचमी या दिवशी संपूर्ण भारतभरात चैतन्याचे प्रतिक असलेल्या पिवळ्या रंगाची वस्त्रे परीधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. नवसृजनाचे, चैतन्याचे, प्रेमाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतूचा आणि कामदेवाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून प्रेमाचे प्रतीपादन करणार्‍या कामदेवाच्या जन्मदिवसास 'वसंत पंचमी' हे नाव!


कामदेव हा पाश्चात्य संस्कृतीमधील क्युपिडचाच भारतीय संस्कृतीतील अवतार! जणू शंकराच्या तिसर्‍या चक्षूतील क्रोधमयी अग्नीमध्ये भस्मसात झालेल्या कामदेवाने पाश्चात्य देशात क्युपिडबाळाच्या रूपाने अवतार घेतला. दोघांच्याही हातात हृदयाला प्रेमविभोरांनी घायाळ करणारे प्रेमबाण असतात.

तब्बल ४६ वर्षांनी १४ फेब्रूवारी या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे व 'वसंत पंचमी' दिनानिमित्त दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ झाला आहे. भारतीय काय किंवा पाश्चात्य काय दोन्ही संस्कृती प्रेमाचा संदेश देताहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे चे वावडे असणार्‍यांनी या वर्षी १४ फेब्रूवारी ला 'वसंत पंचमी' प्रेमदिन साजरा करण्यास हरकत नाही.
तशीही आपली संस्कृती प्रेमाचाच संदेश देते. मित्रांवर तसेच शत्रूंवरही प्रेम करण्याचा संदेश देते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचा अर्थ फक्त शृंगारापर्यंतच मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीतील प्रेम जितकं रांगडं, रगेल- रंगेल आहे तितकंच राजस आणि लोभस, नाजूक आणि नजाकतदार, हळवं आणि हळूवार आहे. वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, लळा, कळकळ, काळजी, धाक, आधार, भूतदया, कळवळा,माया, ममता, श्रद्धा, भक्ती, त्याग, समर्पण ही सर्व प्रेमाचीच रूपे! कृष्णाच्या प्रती असलेली राधेची भक्ती हे प्रेमाचेच रूप तर मीरेचे समर्पणही प्रेमच!

राधेच्या भक्ती कथांचे विवेचन सर्वत्र आढळते. पण मीरेचे समर्पण... याविषयी मायबोलीवर सुंदर विवेचन वाचावयास मिळाले. जवळपास सर्वच स्त्रियांच्या अंतरात एक मिस्टर राईट वा मिस्टर परफेक्ट दडलेला असतो. म्हणजे त्या मि. परफेक्टच्या ठायी असलेल्या अपेक्षित गुणांचे जिगसॉ पझल्ससारखे तुकडेच! भेटलेल्या प्रत्येक पुरूषामध्ये ती स्त्री आपल्या अपेक्षित गुणांचे तुकडे ठेऊन पाहते. सर्व तुकडे सांधले जाऊन मि. परफेक्टचं पूर्ण कोडं उकलतच नाही. पण त्यातील जास्तीत जास्त अपेक्षांचे तुकडे ज्यामध्ये बसतील त्याला ती आपला मि. परफेक्ट म्हणून स्वीकारते. पण मीरेचं तसं नव्हतं. मीरेने श्रीकृष्णालाच तिचा मि. परफेक्ट म्हणून निवडले. त्याच्याविषयी कुठलाही पूर्वग्रह वा अपेक्षा न बाळगता... त्याच्या सर्व गुणांनाच तिने मि. परफेक्टचे गूण म्हणून स्वीकारले. त्यामुळे तिच्या मनातील मि. परफेक्टची प्रतिमा आधीपासून परफेक्टच होती...परीपूर्ण, एकसंध, अभंग! ज्या प्रतिमेला ती परीपूर्णपणे समर्पित झाली. तिचा विरह, व्याकूळता, समर्पण यांतून अवीट मार्दव व माधुर्याची गोडी असलेली भक्तीगीते जन्मास आली. मीरेचा हा समर्पणभाव आपल्या ठायी येईल त्यादिवशी आपला मिस्टर परफेक्ट/मिस परफेक्टचा शोध संपूष्टात येईल.

म्हणून या वर्षी खर्‍या अर्थाने प्रेम करा... प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या.
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
तुमचं आणि आमचं अगदी...


व्हॅलेंटाईन्स डे आणि 'वसंत पंचमी' च्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!!

--- स्वप्नाली वडके तेरसे
('वसंत पंचमी' संदर्भ : लोकसत्ता, मुंबई वृत्तांत, मंगळवार, १२ फेब्रु. २०१३)

आयडियाची व्हॅलेंटाईन्स डे ची नवी जाहीरात... "हॅ! बीस रूपयेका फ्लॉवर?? इससे अच्छा तो कॉलीफ्लॉवरही ले आते..." म्हातारी हेटाळणीच्या सूरांत म्हणते आणि जवळजवळ त्याच क्षणी तू चमकून माझ्याकडे पाहीलंस आणि एका डोळ्याने मी तुझ्याकडे! तुझी ती प्रतिक्रिया अपेक्षित होतीच मला! वर हसून म्हणालासही..."म्हातारी तुझाच अवतार दिसतेय!" मी हसले. तुझ्या अपेक्षित प्रतिक्रियेवर आणि त्या म्हातारबाबांच्या डिट्टो तुझ्यासारख्याच हताश प्रतिक्रियेवर!



तू महागडं गिफ्ट आवडीने आणायचंस आणि मी टॅग चाचपडत "खूप महाग आहे नै.." असा आंबट चेहरा करत तुझ्या उत्साहावर विरजण घालायचं हे तर ठरलेलंच असतं. खरंतर आपण कित्ती वेगवेगळे आहोत ना... मी खूप्प गोडमिट्ट खाणारी आणि तू झणझणीत चमचमीत मसालेदार! तुला चायनीज प्रिय तर मला अज्जिबात आवडत नाहीत ते बुळबुळीत प्रकार... (अर्धी भीती की पॅक पॅक ऐवजी क्वॅक क्वॅक्/चींचीं किंवा मग अगदीच डरावचा एखादा बुळबुळीत लेग पुढ्यात येईल... विचारानेच पोटात ढवळलं बघ यॅक्क!!)
मला पंजाबी ग्रेव्हीवाल्या डिशेस आणि कुल्चा/पराठा/नान ऑल टाईम फेव तर तुला ते काजू, कांदा- टोमॅटोंच्या गोडूस ग्रेव्हीजचं वावडं! त्यामुळे हॉटेलात दोघांपैकी एकाला नित्यनेमाने खवय्येगिरीची इच्छा दडपून टाकावी लागते. तू काटेकोर स्वच्छतेवाला, परफेक्शनिस्ट आणि माझा आपला बागडबिल्ली गबाळखाना! तू ब्रँड कॉन्शस अगदी 'शूजपण वूडलँड्सचेच हवेत' कॅटॅगिरीवाला आणि मी मात्र श्शी ते कळकट्ट शूज २००० वाले वाटतात तरी कै? असं नाकं मुरडत ऑल सिझनची २५०-३०० वाली दादर पूर्वच्या एखाद्या छोट्याशा चप्पल स्टोअर मधून चप्पल घेणारी! तुझे ड्रेसेस मॉलमधले... मी मात्र 'जय हिंदमाता' वाली!!

आपल्या इवल्याश्या किचनमध्ये माझी झारे-चमचे-सुर्‍या आयुधांसह मारामारी चालू असताना तुझी अनावश्यक लुडबूड आणि हजारभर स्वच्छतेचे नियम कम सूचना मला फार इरिटेट करतात तर माझं दिवसभर सोशल नेटवर्कींगच्या साईटवर सतत 'माझे अभिनव विचार' पोस्टत पडीक असल्याने तुझ्या डोक्यात तिडीक जाते. खरंच आपण खूप वेगवेगळे आहोत ना! अगदी दोन ध्रुवांसारखे विरूद्ध स्वभावाचे! आपल्या नावांची आद्याक्षरं पण बघ 'S' आणि 'N' अगदी साऊथ आणि नॉर्थ पोल! यावर तू कौतुकाने म्हणालेलास, "अपोझिट पोल्स अ‍ॅट्रॅक्ट इच अदर!" आपलं अगदी तसंच आहे ना?

खुपदा विचार करते आपण एवढे वेगळे तरीही आपण एकत्र कसे? बर्‍याचदा या वेगळेपणातही साम्य जाणवतात... चंगोच्या चारोळ्या, सौरव गांगुली, फोटोग्राफीची, नाटकांची, क्रिकेटची, आर्ट आणि पेट्रिओटिक सिनेमांची आवड, छान काही वाचण्याची-पाहण्याची, फिरण्याची आवड, (कित्तीही नाकं मुरडली-शिव्या घातल्या तरी) तुझ्या प्रिय वपुंची फिलॉसॉफी, बरीचशी मतं-तत्वं आहेत मिळतीजुळती! आणि आपल्याला घट्ट जोडणारी लिंक आहेच त्याशिवाय का बर्‍याचदा तुला काही बोलायचं असताना मीच आधी ते बोलून टाकते...'तुमने मूंह की बात छीन ली...' असं नेहमी होतं. मग तरीही आपण बर्‍याचदा एकमेकांसाठी अनभिज्ञ का असतो? माझ्या बर्‍याचशा आवडीनिवडी तुला माहीतच नाहीयेत अजूनही ही माझी तक्रार तर तुला सध्या मी फार गृहीत धरते, तुझ्याकडे दुर्लक्ष करते ही तुझी तक्रार.

त्यादिवशी फेसबूकच्या माझ्या पेजवरील छान काहीसं सुचलेलं तुला वाचायला दिलंस तेव्हा नेहमीसारखाच भारावून गेलेलास, भावूक झालेलास. तुझ्या डोळ्यांतील हे भारावलेपण, माझ्याबद्दलच्या कौतुकाची चमक मला फार फार आवडते... पेज लाईक्सपेक्षा कित्येक पटींनी जास्त! मी पटकन बोलून गेले,"मला हे सगळं सर्वात आधी तुला वाचायला द्यायचं असतं रे, पण तू भेटतच नाहीस बघ हे लिहील्या लिहील्या वाचायला द्यायला..."
"मी असतो गं, तुझ्याकडेच वेळ नसतो माझ्यासाठी...!" मी चमकून पाहीलं तर तुझ्या डोळ्यांत दुखावलेपणाचं पाणी! क्षणभर माझ्या हृदयाचंच पाणी पाणे झालं...

खरंच रे... बाळ झाल्यापासून, टिव्ही आणल्यापासून, लॅपटॉप घेतल्यापासून आपण एकमेकांना खूप कमीवेळा भेटतो ना... खूप काही सांगायचं असतं मनातलं, काही लाडीक तक्रारी... प्लॅनिंग्ज असतात, स्वप्नं असतात, खूप काही शेअर करायचं... सारं सारं राहूनच जातंय का? गृहीत धरतोय एकमेकांना... आणि मग त्यातून गैरसमज! तू निदान मनातलं सगळं सांगतोस, मला जमतच नाही मनातलं सांगायला. त्यादिवशी सगळे लेख कौतुकाने वाचलेस, अचानक विचारलंस, "एकदा लिहीशील फक्त माझ्याबद्द्ल? माझ्यासाठी??"

तुझ्याबद्दल लिहावंसं?? काय लिहू? तुला ऐकायचं असतं माझ्याकडून तुझ्याबद्द्ल... बरंच काही!! जमतच नाही मला सांगायला... तुझ्याबद्दल आवडणारं, खटकणारं... कधी जमेल माहीत नाही! एवढ्याशा लेखात, आपलं वेगळेपण तरीही एकत्र असणं, आपलं नातं, चुकत माकत, धडपडत, एकमेकाला सावरत इथपर्यंत आलोय तो प्रवास, एकमेकांना जे काही भरभरून दिलं ते प्रेम कधी कधी दु:खंही... मावणार नाहीच सारं काही इथे! सांगायचंय तुला, जमेल तसं... जमेल तेव्हा... व्यक्त व्हायचंय तुझ्यापुढे! तुझं परफेक्शनिस्ट असणं, राग किंवा तक्रारही त्रागा न करता हळूवारपणे स्पष्टपणे मांडणं, तुझा देशाबद्दलचा अभिमान, तुझं अतिसंवेदनाशील असणं, तुझं छान माणूस असणं, गरीब-गरजूंना जमेल तितकी मदत करणं, माझ्यापुढे अगदी लहान मूल होऊन लाड पुरवून घेणं, गाल फुगवून तक्रारी करणं, आपल्या बाळाचा लाडका बाबा नव्हे आईच असणं (त्याला मी तर फक्त जन्म दिलाय, खरं आईपण - अतिकाळजीने निभावतोस तूच!) सगळं सगळं खूप लोभस आहे रे... सांगेन तुला हे सर्व कधीतरी थकून भागून घरी येशील, माझ्या मांडीवर डोकं ठेवशील, तेव्हा तुझ्या केसांतून हळूवारपणे हात फिरवत सांगेन ना... जमेल तसं.

माझ्या एका खूप खास मैत्रीणीने (ओळखलं असशीलच ती मैत्रीण कोण ते! बरोब्बर! सासूच तुझी!!!) सांगितलेलं, "नवरा लहान मुलासारखाच असतो, त्याला कधी कधी स्वतःचा खूप खास वेळ द्यायचा, त्याचे लाड-कोड पुरवायचे, विशेषतः आपल्याला बाळ झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष अज्जिबात होऊ द्यायचं नाही!" तिचं म्हणणं पाळेन बरं मी तंतोतंत, न कंटाळता! कायम माझा पहीला मुलगाच राहा!! तुला बरंच काही सांगायचं असतं मला, माझ्याकडून ऐकायचं असतं... आजपासून तू घरी आल्यानंतरचा स्पेशल टाईम फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!


आणि हो कधी सांगितलं नव्हतं पण गेल्यावर्षी तुझी छोटीशी डिट्टो कार्बनकॉपी मला गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. या वर्षीचा आपला व्हॅलेंटाईन डे फार खास असणारेय माहीतेय? आपल्या नात्याला दृढ करणारे, आपल्या हातांची गुंफण अधिकच घट्ट करणारे चिमुकले हात आपल्यासोबत असणारेत... सो हॅप्पी हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!!!


-- स्वप्नाली वडके तेरसे